Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुण पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेला दगडांनी भरलेला टिपर अचानक उलटला आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम राजेश उबेरहांडे (वय २२, रा. पांगरी उबेरहांडे, जि. बुलढाणा) आणि भूमिका समाधान खेडेकर (वय २१, रा. अंतरी खेडेकर, जि. बुलढाणा) हे दोघे त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन दुचाकीवरून परतत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास, एमएच १५ एव्हाय ६५ क्रमांकाच्या दुचाकीवर असताना हा अपघात घडला.
त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ उतारावरून येणारा टिपर समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या सिलिंडरने भरलेल्या ‘छोटा हत्ती’ टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावल्याने नियंत्रणाबाहेर गेला आणि उलटला. टिपरमधील दगड दुचाकीवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या मदतीने उलटलेला टिपर बाजूला करण्यात आला. पंचनामा करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातामुळे भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे होणारे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.







