Mumbai Local Ticket : भारतीय रेल्वेने अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी वापरला जाणारा UTS मोबाईन ॲप 1 मार्च 2026 पासून अधिकृतपणे बंद केला आहे. मुंबई लोकलसह देशभरातील अनारक्षित तिकिटांसाठी आता RailOne हा एकमेव अधिकृत ॲप वापरावा लागणार आहे. जानेवारीपासून UTS टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत होता; 1 मार्चपासून त्यावरून तिकीट किंवा पास खरेदी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

रेलवन का महत्त्वाचा?
रेल्वेने ‘वन नेशन, वन रेल ॲप’ या संकल्पनेतून रेलवन सुरू केले आहे. आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकीट, हंगामी प्रवास पास, तिकीट रद्द करणे, परतावा, तक्रार नोंदणी ही सर्व कामे आता एका ॲपवर करता येणार आहेत. गाडीचे थेट स्थान (लाइव्ह लोकेशन) पाहण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. तसेच IRCTC सोबत नोंदणीकृत ठिकाणांवरून प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ मागवण्याची सोयही रेलवनवर देण्यात आली आहे.
UTS वापरकर्त्यांनी काय करावे?
UTS वापरकर्त्यांना नवीन खाते उघडण्याची गरज नाही. रेलवन ॲप डाउनलोड करून UTSचेच लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरता येतील. पासवर्ड विसरल्यास नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलवर OTP द्वारे तो पुन्हा तयार करता येतो. प्रवेश केल्यानंतर ‘माय बुकिंग’ विभागात आधीची तिकिटे आणि पास दिसतील.
UTSवरील आर-वॉलेटमधील शिल्लक रक्कम, वैध पास आणि आधी खरेदी केलेली तिकिटे आपोआप रेलवनवर हस्तांतरित होतील. यासाठी वेगळी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. मात्र, 1 मार्चनंतर UTSवरून नवीन तिकिटे किंवा पास खरेदी करता येणार नाहीत. आधी घेतलेला हंगामी पास त्याच्या वैधतेपर्यंत लागू राहील.
सवलती आणि परतावा योजना
रेलवनचा वापर वाढावा यासाठी रेल्वेने 3 टक्के सवलत जाहीर केली आहे. तसेच BHIM UPI द्वारे तिकीट खरेदी केल्यास कॅशबॅक देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी याचा अर्थ काय?
मुंबई लोकलसारख्या दैनंदिन प्रवासात वेगवेगळ्या ॲप्सचा गोंधळ टाळून एकाच व्यासपीठावर सर्व सेवा मिळणार आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी लवकरात लवकर रेलवन ॲप डाउनलोड करून प्रवेश तपासणे आणि आर-वॉलेटमधील शिल्लक रक्कम पाहणे योग्य ठरेल. डिजिटल तिकीट व्यवस्थेतील हा बदल अधिक सोपी, एकसंध आणि प्रवाशांसाठी सुलभ रेल्वे सेवा देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






