Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे जमीन वादाने थेट रक्तरंजित वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असला, तरी हा केवळ अपघात नसून थंड डोक्याने आखलेला कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी (ता. 02) सायंकाळी चार ते सव्वा चारच्या सुमारास उरुळी कांचन–भवरापूर रस्त्यावर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात घडली.

या धडकेत भवरापूर (ता. हवेली) येथील महेश लक्ष्मण साठे (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महेश साठे आणि त्यांचा चुलत भाऊ अक्षय दशरथ साठे (वय 32) यांच्यात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर महेश साठे हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तक्रार देऊन ते दुचाकीवरून भवरापूरकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली.
या धडकेत महेश साठे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारी कार अक्षय साठे चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महेश यांनी आपल्या विरोधात तक्रार दिल्याचा राग मनात धरून अक्षयने सूड उगवण्यासाठीच ही धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. किरकोळ जमीन वादातून चुलत भावानेच चुलत भावाचा ‘काटा काढला’ का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, “भवरापूर येथील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.







