Maharashtra Government Scheme : महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी केंद्र सरकारकडून ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आई’ नावाची खास योजना राबवली जातेय. या योजनेत पर्यटन आणि त्याच्याशी जोडलेल्या व्यवसायांकडे महिलांना वळवलं जात आहे. पर्यटन, कृषी पर्यटन, होम स्टे, प्रवासी वाहतूक, हस्तकला, खाद्यपदार्थ विक्री असे तब्बल ४५ प्रकारचे उद्योग या योजनेत येतात. म्हणजे ही योजना फक्त फिरण्यासाठी नाही, तर महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा, कमाई करावी आणि सन्मानाने जगावं, यासाठी आहे. (Maharashtra Government Scheme)

बिनव्याजी कर्ज
या योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे १५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तेही पूर्णपणे बिनव्याजी. बँकेतून घेतलेल्या कर्जाचं व्याज सरकार भरतं, त्यामुळे महिलांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत नाही. त्याशिवाय हॉटेल, रिसॉर्ट किंवा होम स्टे सुरू करायचं असेल तर गुंतवणुकीवर १५ ते २५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं. नोंदणी शुल्कात सूट, विम्याच्या हप्त्याला मदत अशा अनेक सवलतीही दिल्या जातात. ही योजना ‘पंचसूत्री’ तत्त्वांवर चालते आणि महिला टॅक्सी सेवा, बचत गटांची रेस्टॉरंट्स, टूर एजन्सी, साहसी पर्यटन अशा विविध व्यवसायांचा त्यात समावेश आहे. व्यवसायाची पूर्ण मालकी महिलेकडे असेल किंवा किमान ५० टक्के भागीदारी महिलांची असेल, तर या योजनेचा लाभ घेता येतो.
अर्जासाठी कोणती कागदपत्र लागतात?
आधार, पॅनकार्ड, बँक पासबुक, व्यवसाय नोंदणी कागदपत्रे, मालकीचे दस्तऐवज, फोटो, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि लागणारे परवाने तयार ठेवावे लागतात.
अर्ज कसा करायचा
अर्ज पर्यटन संचालनालयाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा असतो.
पर्यटन विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित बँकेत कर्जासाठी अर्ज करून पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ग्रामीण असो वा शहरी भाग, महिलांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमतेची नवी वाट दाखवणारी ठरत आहे.







