मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत (Ladaki Bahin Yojana) मोठा गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक तथ्य पुढे आले आहे. निवडणुकीपूर्वी आलेल्या अर्जांची तपासणी शक्य न झाल्याने, सरकारने आता मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. सरकारने विविध विभागांना रक्कम वसुलीचे आदेश दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

योजनेच्या अटींनुसार इतर सरकारी योजना घेत असल्यास किंवा ठराविक उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा स्पष्ट मर्यादा होत्या. तरीही अनेकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9,526 महिलांनी सुमारे 14.50 कोटी रुपये नियमबाह्यरित्या घेतल्याचे समोर आले आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे 14,298 पुरुषांनी स्वतःला ‘लाडकी बहीण’ दाखवून तब्बल 21.44 कोटी रुपये उचलल्याचे पडताळणीत उघड झाले आहे.
सरकारने विविध विभागांना रक्कम वसुलीचे आदेश दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासात अडथळा आणणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दिलासा मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरवापरामुळे आता अनेकांची अडचण वाढण्याची शक्यता असून राज्य सरकारने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे.







