पुणे: गोव्यातील (Pune News) एका नाईट क्लबमध्ये झालेल्या अपघातानंतर अशी दुर्दैवी घटना पुण्यात घडू नये यासाठी पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल त्वरित हाय-अलर्ट मोडवर आले आहेत. पुणे शहरात अशा भीषण घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर धोरण स्वीकारले आहे. यामुळे, शहरातील सर्व पब, रेस्टॉरंट्स आणि उपाहारगृह चालकांना त्यांच्या सुरक्षा प्रणालीची कसून तपासणी करण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

नववर्षापूर्वी सुरक्षा उपाययोजनांची पाहणी
नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने पब, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये प्रचंड गर्दी जमण्याची शक्यता असते. या काळात कोणत्याही प्रकारची जोखीम टाळण्यासाठी, सुरक्षा उपायांवर विशेष लक्ष केंद्रित करणे अनिवार्य आहे. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे (परिमंडळ 4) यांनी व्यावसायिकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आस्थापनांनी तातडीने तपासणी करावी की, इमारत पूर्णपणे सुरक्षित आहेत की नाहीत. तसेच, आग लागल्यास किंवा आपत्कालीन दरवाजे आहेत की नाहीत, याची खात्री करावी. याव्यतिरिक्त, आग विझवण्यासाठी सर्व सुरक्षा उपकरणे आहेत की नाहीत, याची पडताळणी करणे आवश्यक आहे.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्रशासनाने सर्व व्यावसायिक आस्थापनांना विनंती केली आहे की, त्यांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे, जेणेकरून पुण्यात अशा घटना घडणार नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, अग्निशमन दल लवकरच एक सूचना वजा परिपत्रक प्रसिद्ध करणार आहे. हे पत्र संबंधित हॉटेल्स आणि पबना दिले जाईल. या मार्गदर्शक सूचनांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कार्यवाही कशी करावी आणि सुरक्षिततेसाठी कोणकोणते उपाय लगेच अमलात आणावेत, याची विस्तृत माहिती उपलब्ध असेल. तसेच नागरिकांनी पब, रेस्टॉरंट्समध्ये जातांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.







