दौंड, (पुणे): पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याने पायी निघालेल्या माय लेकराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खडकी (ता. दौंड) (Daund News) गावच्या हद्दीतील पुणे-सोलापुर महामार्गावरील सेवा रत्यावर शिंदे अँक्वा पाणी प्लँट जवळ सोमवारी (ता. 08) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रूपाबाई सिताराम सांवत (वय-38), संग्राम सिताराम सावंत (वय-11, रा. दोघेही, खडकी ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या माय लेकराचे नाव आहे. याप्रकरणी ज्योती दादाजी सावंत (वय-30, व्यवसाय-गृहिणी, रा. तुकाईनगर, खडकी ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कार नं एमएच 12 एक्स. क्यू 0201 वरिल अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील खडकी (ता. दौंड) गावच्या हद्दीतील सेवा रत्यावरून फिर्यादी ज्योती सावंत चुलत सासू रूपाबाई सावंत व त्यांचा मुलगा संग्राम सावंत असे पायी चालत निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सेवा रत्यावर शिंदे अँक्वा पाणी प्लँटजवळ पुण्याच्या बाजूकडुन येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कार नं एमएच 12 एक्स. क्यू 0201 वरिल अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात व रहदारीच्या नियमनाकडे दुर्लक्ष करून जोरदार धडक दिली.
या घटनेत दोघेही गंभीर व किरकोळ दुखापती व मृत्युस कारणीभूत झाले. सदर चारचाकीवरील चालक अपघाताची खबर न देता. औषधोपचारासाठी न नेता तेथून पळून गेला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कार नं एमएच 12 एक्स. क्यू 0201 वरिल अज्ञात चालकाविरूध्द भा.न्या.संहिता कलम 106(1),281,125a,125b, मो.वा.कायदा 184,134,177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार मलगुड करीत आहेत.






