Kolhapur News: कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आटेगाव परिसरात शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली असून दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून एका कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आटेगाव येथील अनुराधा नामदेव कांबळे (वय 38) या शनिवारी दुपारी घरातील कपडे धुण्यासाठी दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यावर गेल्या होत्या. साधारण 3.30 ते 4.00 वाजण्याच्या सुमारास त्या कालव्याच्या काठावर काम करत असताना त्यांचा अचानक तोल गेला. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने त्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बराच वेळ झाला तरी अनुराधा घरी न परतल्याने त्यांचे पती नामदेव कांबळे आणि इतर नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना कालव्याच्या काठावर त्यांच्या चप्पला आणि भिजलेल्या गोधड्या आढळून आल्या. यामुळे कुटुंबीयांच्या काळजात धस्स झाले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. शनिवारी अंधार झाल्यामुळे शोध कार्यात अडथळे आले. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर सरवडे परिसरातील कालव्याच्या झुडुपात अनुराधा कांबळे यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
मृतदेह सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून राधानगरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अनुराधा कांबळे यांचे पती नामदेव कांबळे हे गावाचे उपसरपंच आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आईच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रशासनाकडून कालव्याच्या परिसरात काम करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







