Indrayani River Bridge : पुणे : आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूलची अवस्था बिघडल्याने तो दुरुस्तीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती प्रशासनाने दिली आहे. हा पूल चरहोली बुद्रुक आणि चरहोली खुर्द या भागांना जोडणारा असून श्रीमंत सरसेनापती खडेराव धाभाडे पूल असे त्याचे नाव आहे. पुलाची अवस्था कमकुवत झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला होता. Pune News

हेही वाचा- १ लाख १० हजारांचे मोबाईल नागरिकांना परत, बारामती तालुका पोलिसांची कामगिरी..
हा पूल दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या देहू गाव आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याअंतर्गत बांधण्यात आला होता. सुमारे 12 मीटर रुंदीचा हा पूल आता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणताही अपघात आणि मोठी हानी टाळण्यासाठी पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जाणून घ्या पर्यायी मार्ग
पूल बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. देहू फाट्याकडून येणारी वाहतूक अलंकापुरम चौक किंवा तापकीर चौक, पांजरपोळ चौक किंवा गोडाऊन चौक मार्गे मोशीकडे जाऊ शकते. मॅगझिन चौकातून येणाऱ्या वाहनांनी अलंकापुरम चौकातून डावीकडे वळून पुणे-नाशिक महामार्गाचा वापर करावा. देहू फाटा चौकातून येणाऱ्या वाहनांनी भारत माता चौक मार्गे पुणे-नाशिक महामार्गाकडे जावे.
तुळापूरकडून येणाऱ्या वाहनांनी मरकळ गावात उजवीकडे वळून कोयाळी गाव मार्गे चाकण-शिक्रापूर महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही कळवण्यात आले आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल यांची अवस्था पाहून नागरिकांनी डोक्यालाच हात लावला आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकरत दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






