Pune News : पुणे शहर आणि आसपासच्या भागातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती विधानसभेत देण्यात आली. मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की, रिंग रोडच्या पूर्व भागाचं काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल, तर पश्चिम भागाचं काम २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. याशिवाय हडपसर ते लोणी काळभोर या मेट्रो मार्गाबाबत सध्या व्यवहार्यता तपासली जात असून, त्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (pune news)

ही माहिती आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा करताना देण्यात आली. या चर्चेत आमदार सुनील शेळके आणि अभिजित पाटील यांनीही सहभाग घेतला. पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलं. रिंग रोड पूर्व भागातील १२ पैकी ९ पॅकेजेसची कामं सध्या वेगात सुरू असून, उर्वरित तीन पॅकेजेस अजून प्रशासकीय मान्यतेच्या टप्प्यात आहेत. या तिन्ही पॅकेजेसची निविदा प्रक्रिया पुढील वर्षी मेपूर्वी पूर्ण होईल आणि ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं. (Pune News)
पुण्यात इतर रस्ते प्रकल्पांनाही चालना मिळत आहे. हडपसर ते यवत या उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, पुणे ते शिरूर या उन्नत मार्गाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. ही सर्व कामं एमएसआयडीसीकडून करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झालं आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा उन्नत मार्ग प्रस्तावित असून, त्यासाठीही निविदा प्रक्रिया सुरू असल्याचं भुसे यांनी सांगितलं.
मेट्रोबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, महामेट्रोकडून सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. उड्डाणपूल, रस्ता क्रॉसिंग यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व बाबींची व्यवहार्यता तपासल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून प्रकल्पांच्या परवानग्या, भूसंपादन आणि कामांच्या प्रगतीचा दर महिन्याला आढावा घेण्याचे आदेश दिले असल्याचं भुसे यांनी सांगितलं. तसेच सोलापूर-पुणे रस्त्याबाबत बैठक झाली असून, हे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.






