पुणे : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील तीन डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या 4 साथीदारांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने स्वतःहून दखल घेत या सर्वांचा जामीन रद्द केला असून, रमेश म्हात्रे यांना उद्या, म्हणजेच 19 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचे (शरण येण्याचे) कडक निर्देश दिले आहेत.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची विशेष सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले की, कनिष्ठ न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन मंजूर करताना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

रमेश म्हात्रे यांच्यावर यापूर्वी तब्बल 18 गुन्हे दाखल असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर व क्रूर गुन्ह्यांचा समावेश आहे. जरी यातील 17 प्रकरणांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली असली, तरीही सत्र न्यायालयाने त्यांच्यावरील या सर्व जुन्या गुन्ह्यांचा विचार करायला हवा होता, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी आगामी 22 जुलै रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. उच्च न्यायालयाने या नियोजित संपाचीही नोंद घेतली. आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना तात्काळ कोठडीत पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर, न्यायालयाने डॉक्टरांच्या संघटनेला या संपाबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांचे काम हे ‘मानवतेची सेवा’ आहे, त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांनी संप मागे घ्यावा, अशी विनंती खंडपीठाने केली आहे.







