पुणे : महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती आणि राज्य सरकारला दुष्काळही जाहीर करावा लागला होता. अशातच हवामान विभागाने राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी दिली असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस असाच सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलामुळे कोरड्या वातावरणातून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाचा जोर वेगवेगळा असणार आहे.परभणी, बीड, पुणे, सातारा आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कोरडे हवामान आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी वर्ग तसेच सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. आता हवामान विभागाच्या या नवीन अंदाजामुळे कोरड्या हवामानाला ब्रेक लागून पिकांना आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला काही प्रमाणात मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडूनही या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







