पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराच्या घटनांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवलं असून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदाराच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा मिठाचा खडा पडला आहे.

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत भविष्यात ऑफर आली तर नक्कीच विचार करेन,’ असे खळबजनक वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून शरद पवार यांच्या पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या महिनाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे यांच्या गटाला दोन मोठे धक्के दिले. सत्ताधारी शिवसेनेकडून अजूनही मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पवार यांनी या अफवा फेटाळून लावल्या असतानाच, अमोल कोल्हे यांनी केलेल्या या नवीन विधानामुळे राजकीय समीकरणांना वेगळेच वळण मिळाले आहे.
खासदार सुनेत्रा पवार यांच्या गटात राष्ट्रवादीचे काही नेते जाणार या चर्चा पुन्हा एकदा रंगात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ही राजकीय सत्ता कौशल्याची लढाई आगामी काळात काय नवे वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





