धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीस वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याच्या भीतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथील बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर याने आत्महत्या केली आहे. हा तरुण बी फार्मसीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. बंटी हा फक्त 20 वर्षाचाचं होता. मोबाईल हॅक झाला आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले या भीतीने बंटीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.
शिरपूर तालुक्यातील थाळनेरजवळ असलेल्या ताजपूरी गावातील सनेर कुटुंबातील किशन हा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. किशनने त्याच्या राहत्या घरीच गळफास घेतला. कुटुंबाने त्याला पहिले असता तात्काळ रग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर त्याने नैराश्यातून हे पाऊल उचलले. या घटनेची थाळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले की, तरुणाचा मोबाईल हॅक झाल्याची माहिती समोर आली असून, याची पुढील चौकशी सुरु केली आहे.







