मुंबई : ठाण्यातील लुईसवाडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याजवळ उभ्या असलेल्या एका पोलीस एस्कॉर्ट वाहनाला मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. वाहनातून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने पेट घेतला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दिवाळीच्या उत्साहात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात असताना ठाण्यात ही घटना घडली. शिंदे यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांच्या गाड्यांची रांग उभी होती. त्यातील एका गाडीतून अचानक धूर निघू लागल्याचे तेथील कर्मचार्यांच्या लक्षात आले. क्षणात आग पसरल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाल करत अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी असल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि मोठी हानी टळली. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.








