पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांच्यावर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयात अत्यावश्यक सेवा देत असताना ते मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे आढळल्याने महापालिका प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर रोजी डॉ. म्हस्के हे मद्यप्राशन करून कर्तव्यावर हजर राहिले होते. या प्रकारामुळे रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला आणि रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. या गंभीर बाबीची दखल घेत रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तात्काळ सविस्तर अहवाल तयार करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवला.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेली आचारसंहिता आणि सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे महापालिका आयुक्तांनी डॉ. म्हस्के यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 व 28 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 56 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 8 नुसार डॉ. म्हस्के यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांच्या आत त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले जाईल. निलंबनाच्या कालावधीत त्यांना पिंपरी येथील मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, कोणताही खाजगी व्यवसाय किंवा इतर नोकरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशीच कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.






