पुणे: पुण्यातील विषारी दारूने 20 निष्पाप लोकांचा बळी घेतल्याने संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवघ्या ८०० रुपयांच्या अतिरिक्त नफ्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये घातक ‘मिथेनॉल’ची भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेची गांभीर्याने दखल घेत, कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ९ पोलिसांना प्रशासनाने तात्काळ निलंबित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा गेल्या ३ ते ४ वर्षांपासून उरळीकांचन येथील राधेश्याम प्रजापतीकडून हातभट्टीची दारू खरेदी करायचा. तो ३५ लिटरचा दारूचा कॅन १,९०० रुपयांना विकत घेऊन, तो २,७०० रुपयांना विकायचा. अधिक नफा मिळवण्यासाठी त्याने ‘इंडिया मार्ट’ या ऑनलाइन वेबसाइटवरून २१५ लिटर मिथेनॉल मागवले होते. त्याने तब्बल ८४० लिटर मिथेनॉल मिश्रित दारू तयार केली होती, ज्यातील २०० लिटर दारू बाजारात विकली गेली.
हातभट्टीची दारू बनवण्यासाठी मोहाची फुले, गूळ, नासलेली फळे आणि विविध स्टार्चयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. दारूची नशा तीव्र करण्यासाठी त्यात युरिया, बेसरमबेलची पाने आणि ऑक्सिटोसिन मिसळले जाते, ज्यामुळे ‘मिथाईल अल्कोहोल’ तयार होते. हे विषारी रसायन शरीरात गेल्यावर त्याचे फॉर्मेल्डाईड आणि फॉर्मिक ॲसिडमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे मानवी अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवतो. अत्यंत स्वस्त दरात, म्हणजेच फक्त १० रुपयांत मिळणारी ही पिशवीबंद दारू थेट जीवावर बेतत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या घटनेनंतर संताप करण्यात येत असून, काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलने केली आहेत. या प्रकारानंतर पोलीस प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडण्यात आली असून, सर्व दारू अड्डे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.






