Ashok Kharat : नाशिकमधील भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. महिलेकडून दाखल झालेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते आणि पोलीस महासंचालकांशी थेट संपर्क साधून आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. (Ashok Kharat)

पोलिसांनी आधीच महत्त्वाचे व्हिडीओ क्लिप्स आणि इतर पुरावे ताब्यात घेतले होते, जे या प्रकरणातील गंभीरतेची स्पष्टता दाखवतात. नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर क्राईम ब्रँचने अशोक खरातच्या घरावर छापा टाकला. अटक होण्याआधी तो पळून जाऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नियोजनबद्ध पथक तयार केले होते. एक पथक घराबाहेर तैनात होते, तर दुसरे घरात प्रवेश करून खरातला ताब्यात घेतले गेले.
या घटनेमुळे फक्त नाशिकच नव्हे, तर राज्यभरात भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशोक खरातची कारवाई आणि अटक हे या गैरप्रकारांना थांबविण्याचे पहिले पाऊल मानले जात आहे.
प्रकरणात आणखी एक राजकीय वादही उभा राहिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातच्या पाद्यपूजेसह काही संबंध असल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्याविरोधात राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी चाकणकरांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी भूमिका घेतली. तर खासदार संजय राऊत यांनी या मागण्यावर टीका केली, आणि राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांचा बचाव केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरेंनीही चाकणकरांविरोधात भूमिका घेतली असून पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.







