Aadhar Card Rule: पुणे : राज्यातील खोट्या कागदपत्रांवर मिळालेले, केवळ आधार कार्डाच्या आधारे जारी केलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने अशा सर्व नोंदींची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून, यासाठी 16 मुद्द्यांवर आधारित सविस्तर पडताळणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. (Aadhar Card)

हेही वाचा- हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
गेल्या काही वर्षांत अनेकांनी बेकायदेशीर मार्गाने किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म किंवा मृत्यू दाखले घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये फक्त आधार कार्डाचा आधार घेऊन दाखले जारी झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या नोंदींची विश्वसनीयता तपासण्यासाठी सरकारने ही तपास मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पडताळणीदरम्यान कुठलीही नोंद संशयास्पद वाटल्यास किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास त्या दाखल्यांवर तात्काळ कारवाई होणार आहे. फेरतपासणीत दोषी नोंदी आढळल्यास संबंधित दाखले रद्द करण्यात येतील, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांनी 16 मुद्द्यांनुसार पडताळणी करून याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
कडक कारवाईचे आदेश
जर एखाद्यावेळीस खोट्या नोंदी केलेले बोगस जन्म- मृत्यू दाखले आढळले ते तात्काळ रद्द केले जातील. सोबत पोलिसांत तक्रार देखील केली जाईल. अर्जातील माहिती आणि आधारवरील जन्मतारीख यामध्ये तफावत दिसली, तर सदर व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या मार्गदर्शकांच्या सूचनांच्या आधारावर महसूल विभागाने विशेष मोहीम राबवली आहे.






