मुंबई : नवी मुंबईतील सांस्कृतिक विश्वासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वाढत्या लोकसंख्येला आणि नागरिकांच्या गरजांना लक्षात घेऊन शहरात लवकरच 4 नवीन नाट्यगृहे बांधण्यात येणार आहेत.या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात विशेष बाब म्हणजे, या नाट्यगृहांना कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव न देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या दिग्गज कलाकारांची नावे या वाडियांना दिली जातील.

या भव्य नाट्यगृहासाठी दादा कोंडके, विठ्ठल उमप, मच्छिंद्र कांबळी आणि नाना पाटेकर यांसारख्या महान कलाकारांच्या नावांचा विचार केला जात आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबतची घोषणा केली असून, या निर्णयामुळे नव्या पिढीला या दिग्गजांच्या योगदानाची कायम आठवण राहत राहील.
सध्या शहरात वाशी आणि ऐरोली येथेच नाट्यगृहे उपलब्ध आहेत, ज्यामुळे दूरच्या भागातील रसिकांना नाटकांचा आनंद घेण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असे. हीच अडचण दूर करण्यासाठी आता घणसोली आणि नेरूळसह इतर प्रमुख भागात ही नवीन सांस्कृतिक केंद्र उभारली जाणार आहेत.

शहराचा विस्तार पाहता ही नाट्यगृहे स्थानिकांसाठी पर्वणीच ठरणार आहेत. यामुळे केवळ स्थानिक कलाकारांना आणि नाट्यसंस्थांना प्रोत्साहन मिळणार नाही, तर नवी मुंबईच्या सांस्कृतिक विकासालाही एक नवीन गती मिळेल. आता या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होते आणि वास्तू कधी पूर्ण होतात, याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.







