बारामती : विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनीमोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बारामतीमधील माळेगाव येथील असलेले आणि सध्या पुण्यात राहणारे राणा सूर्यवंशी हे 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.15 वाजता बारामती तालुक्यातील गोजुबाबी येथे जमिनीचा प्लॉट पाहण्यासाठी थांबले होते. याचदरम्यान बुके देण्याच्या बहाण्याने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, सूर्यवंशी यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्राप्त आहे, मात्र घटनेच्या वेळी त्यांची सुरक्षा सोबत नव्हती, तर काही खासगी अंगरक्षक उपस्थित होते.

गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे व बारामती पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुणे शहरातील कर्वेनगर परिसरातून पार्थ वासुदेव अवथळे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, ज्ञानदेव महादेव शिंदे (वय 50) याने राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ज्ञानदेव शिंदे यालाही अटक केली आहे. हा आरोपी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावचा रहिवासी असून, सध्या तो इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील थोरातनगरमध्ये राहत होता. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची एकूण 6 पथके तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, बारामती न्यायालयाने पार्थ वासुदेव अवथळे आणि ज्ञानदेव महादेव शिंदे या दोघांना आगामी 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत






