मुंबई: गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने अभिनय आणि बॉलिवूडला कायमचा अलविदा (Urmila Matondkar Quit Bollywood) म्हटल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. चित्रपटांमध्ये न दिसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी आणि चिंता होती, मात्र उर्मिलाच्या ताज्या वक्तव्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

उर्मिला मातोंडकरने स्पष्ट केले आहे की, तिने अद्याप अभिनय किंवा बॉलिवूड सोडलेले नाही. गेल्या काही काळात ती आपल्या प्रतिभेला न्याय देणाऱ्या, अर्थपूर्ण आणि वेगळ्या भूमिका शोधत होती. त्यामुळे ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही, असे तिने सांगितले.
उर्मिला काय म्हणाली?
एका मुलाखतीत बोलताना उर्मिला म्हणाली की, आता तिला पुन्हा बॉलिवूडमधून चांगल्या आणि रोमांचक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, ती लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असून, नव्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी ती उत्सुक आहे. “आता पुन्हा एकदा सेटवर परतण्याची आणि दमदार पुनरागमन करण्याची वेळ आली आहे,” असे तिने म्हटले आहे.
ओटीटी माध्यमाबाबत बोलताना उर्मिलाने सांगितले की, डिजिटल प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी नव्या संधी घेऊन आले आहेत. “ओटीटीमुळे नवीन पात्रं, वेगळ्या कथा आणि खोल भावनिक स्तर असलेल्या भूमिका साकारण्याची संधी मिळते. हे कलाकारांसाठी एक नवं जग आहे,” असे तिने नमूद केले.
दरम्यान, उर्मिला मातोंडकरने एका ओटीटी शोचे शूटिंग पूर्ण केले असून, हा शो पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर उर्मिलाच्या पुनरागमनाकडे तिचे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत.







