मुंबई: अनेक गुंतवणूकदार केवळ आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात. मात्र, योग्य मालमत्ता वितरण न केल्यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (NPS Scheme) अनेक गुंतवणूकदार सुमारे 2.2 कोटी पर्यंतचा संभाव्य परतावा गमावत असल्याची माहिती समोर आली आहे.

गुंतवणुकीचा गुरुमंत्र
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, केवळ अधिक पैसे गुंतवणे हे अधिक पैसे कमावण्याचे सूत्र नाही, तर वयानुसार तुमच्या मालमत्तांचे पोर्टफोलिओ बदलणे ही परतावा वाढवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. अनेक एनपीएस गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक करून ती तशीच ठेवतात. परंतु, जे गुंतवणूकदार त्यांच्या वयानुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करतात, त्यांना गुंतवणुकीची रक्कम न वाढवताही चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.
पोर्टफोलिओ पुनर्रचना करण्याचे सोपे सूत्र
गुंतवणूक सल्लागारांच्या मते, तुमच्या पोर्टफोलिओची पुनर्रचना करण्याचा एक सोपा मार्ग आहे. सुरुवातीच्या काळात जास्त परतावा आणि चक्रवाढ वाढवण्यासाठी इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करा. शेवटी सेवानिवृत्ती जवळ येत असताना जोखीम कमी करण्यासाठी इक्विटीचा सहभाग हळूहळू कमी करून तो बॉन्ड्सकडे (कर्जरोखे) वळवा. यामुळे निवृत्तीच्या वेळी गुंतवणूक सुरक्षित राहते आणि चांगला परतावा मिळतो.
वयानुसार मालमत्ता वाटपाचे आदर्श प्रमाण
गुंतवणुकीचे प्रमाण (एकूण गुंतवणुकीच्या टक्केवारीत):
वयोगट इक्विटी कॉर्पोरेट बाँड सरकारी बाँड पर्यायी
25-30 75% 15% 5% 5%
36-45 60% 25% 10% 5%
46-55 40% 35% 20% 5%
56-60 25% 40% 30% 5%
हे सूत्र कसे कार्य करते याचे उदाहरण खालीलप्रमाणे:
जर 35 वर्षांच्या व्यक्तीने दरमहा 10,000 जमा केले आणि योग्य मालमत्ता वाटपामुळे त्याला 9% दराने परतावा मिळाला, तर निवृत्तीनंतर त्याला 1.04 कोटी मिळतील. याउलट, त्याने पोर्टफोलिओमध्ये बदल न केल्यास (उदा. 8% दराने परतावा), त्याला केवळ 82 लाख मिळतील. या दोन परताव्यामध्ये तब्बल 22 लाखांचा फरक आहे.
या दृष्टिकोनामुळे सुरुवातीला इक्विटी चक्रवाढ वाढवते आणि नंतर बाँड्स तोट्याचा धोका कमी करतात, ज्यामुळे दीर्घकाळात परतावा संतुलित राहतो. त्यामुळे, विशेषतः 1 कोटी रुपयांचे लक्ष्य असलेले गुंतवणूकदार या धोरणाचा अवलंब करून चांगला परतावा मिळवू शकतात.







