उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हि घटना बुधवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
ओंकार संतोष जगताप (वय- १८, रा. ढोलेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तर विश्वजित अंकुश दासरे (वय-१८, रा. ढोलेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापुर महामार्गावरून बुधवारी सायंकाळी ओंकार व विश्वजित हे त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकीवरून सोलापूरच्या बाजूकडे निघाले होते. साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कांबळे बाग या ठिकाणी आले असता टेम्पो व दुचाकी यांच्यात जोरदार अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ओंकार व विश्वजित हे रोडवर जोरदार आदळले.
दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये ओंकार याचा जागेवरच मृत्यू झाला. तर विश्वजित याला कदम उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असून लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत. उरुळी कांचन येथील कदम अँबुलन्स व कस्तुरी प्रतिष्ठानच्या अँबुलन्स तात्काळ अपघात स्थळी दाखल झाल्या होत्या.