Pune Crime: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लेकाने मिळून एका महिलेची निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या घटनेनंतर पुणे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. पुणे पोलीसांनी (Pune Police) या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (Pune Crime)

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहगाव स्मशानभूमी परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस तपासाची दिशा बदलली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना लाईट बंद असलेली एक संशयास्पद रिक्षा दिसून आली. त्यानंतर लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा या परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली.
तांत्रिक तपासात रवी रमेश साबळे आणि त्याचे वडिल रमेश रामचंद्र साबळे हे दोघे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यांनी महिलेच्या हत्येसंदर्भात विचारणा केली. सुरुवातीला दोघांन्ही उडवा उडवीची उत्तरे दिली आणि त्यानंतर महिलेच्या हत्येची कबुली दिली.
चौकशीत सांगितल्या प्रमाणे, दोघांनी मिळून महिलेला तीन दिवसांपूर्वी वीट आणि दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह घरातच लपवून ठेवला. परंतु 3 ते 4 दिवसांनी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनाही त्रास होऊ लागला. परिस्थिती बिघडल्याचे लक्षात येताच, 18 नोव्हेंबर रोजी पहाटे आरोपींनी रिक्षामध्ये मृतदेह टाकून तो थेट स्मशानभूमी परिसरात फेकून दिला.
दरम्यान, या बापलेकाने महिलेची हत्या कोणत्या कारणासाठी केली? तसेच ही महिला नक्की कोण? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






