Navale Bridge Accident : नवले ब्रिज परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून उतारावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने 1 दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर किमान 5 चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव अशफाक हनिफ चौधरी (वय 36, रा. कोंढवा) असे आहे.
13 मार्चला सकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास नवले पुलाखालील चौकात सिग्नलमुळे वाहने थांबली होती. त्याच वेळी कात्रज बोगद्याकडून उतारावरून येणाऱ्या ट्रकचा वेग अचानक वाढला. तीव्र उतार आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक थेट सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीवर आदळला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकने पुढे उभ्या असलेल्या 5 कारांना एकामागोमाग एक धडक दिली. या धडकेत काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह ट्रकच्या चाकांखाली अडकलेला आढळला.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर वाहनांचे तुकडे विखुरले होते आणि मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवले पूल ते नवीन कात्रज बोगदा हा सुमारे 7 किलोमीटरचा तीव्र उताराचा मार्ग असल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याची समस्या आहे. अवजड वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जाणे, ब्रेक निकामी होणे आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे हा पट्टा धोकादायक ठरतो. यापूर्वीही 13 नोव्हेंबर रोजी याच परिसरात झालेल्या मोठ्या अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
प्रशासनाने वेगमर्यादा, चेतावणी फलक आणि वाहतूक नियंत्रण यांसारख्या उपाययोजना केल्या असल्या तरी अपघातांची मालिका थांबलेली नाही. त्यामुळे या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाढत आहे. नऱ्हे ते रावेत (सुतारवाडीमार्गे) दरम्यान प्रस्तावित उन्नत पुलाचा प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







