Crime : बालविवाहाची अनिष्ट प्रथा एका निष्पाप मुलीच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात उघडकीस आली आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी बोहल्यावर चढवलेल्या एका मुलीने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच मृत्यूला कवटाळले. सासरच्या लोकांकडून होणारा अमानुष छळ आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

नेमकी घटना काय?
मंगळवेढा तालुक्यातील बावची आणि निंबोणी परिसरात काही महिन्यांपूर्वी एका 14 वर्षीय मुलीचा बालविवाह अत्यंत गुपचूप पद्धतीने पार पडला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्या खांद्यावर संसाराची धुरा सोपवण्यात आली. मात्र, हा संसार तिच्यासाठी नरकयातना ठरला. सासरच्या मंडळींनी तिला घरकामासाठी जुंपले आणि किरकोळ कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. यात भर म्हणून पतीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हा सर्व मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने या पीडितेने अखेर राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
प्रशासनाची कारवाई
या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी तत्परता दाखवत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती आणि सासऱ्यासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.







