Crime : अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव परिसरात घडलेली एक घटना तरुणाईच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध केले आणि तिच्यावर दोन सख्ख्या भावांनी अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता तिचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ तयार करून सात-आठ महिने ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक बाब तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (रा. निर्मला कॉलनी, जुनीवस्ती, बडनेरा) या दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकं काय घडलं?
तक्रारीनुसार, २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील एका हॉटेलमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची गेट-टुगेदर पार्टी आयोजित करण्यात आली होती. चेतन अंबाडकरने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विद्यार्थिनीला या पार्टीसाठी बोलावले. पार्टीदरम्यान तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळण्यात आले. पेय घेतल्यानंतर ती शुद्ध हरपली.
यानंतर हॉटेलमधील एका खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आले.
ब्लॅकमेलचा सापळा
तक्रारीनुसार, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी विद्यार्थिनीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवत पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. भीती आणि सामाजिक बदनामीच्या धास्तीमुळे विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला. मात्र मानसिक छळ असह्य झाल्यानंतर तिने धाडस करून नांदगाव पेठ पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली.







