Crime : पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या राजू पाटील (वय सुमारे 45) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 मार्च रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी पाटील घरी एकटे होते. काही वेळानंतर त्यांची पत्नी घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घरात प्रवेश करताच पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्या हादरून गेल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
तपासादरम्यान घरातून एक चिठ्ठी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या वाढत्या ताणतणावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बाबींची अधिकृत पुष्टी तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.
राजू पाटील हे दंतवैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय शिक्षक मानले जात. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नीही त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, शैक्षणिक क्षेत्रात वाढणारा कामाचा ताण, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि संशोधन-शिक्षणातील दडपण यामुळे अनेक शिक्षक मानसिक तणावाला सामोरे जातात.







