Ashok Kharat : नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या आरोपांपासून सुरू झालेला हा तपास आता राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर खोलवर पोहोचताना दिसत आहे. सध्या खरातविरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये 5 महिला आणि 1 पुरुष फिर्यादी आहेत. केवळ कालच 3 नव्या महिलांनी पुढे येत अत्याचाराची तक्रार दिल्याने प्रकरण आणखी गंभीर बनले आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, खरात नाशिकमधील मीरपूर परिसरातील जंगलात असलेल्या ठिकाणी भक्तांना ‘विशेष पूजा’साठी बोलावायचा. भीतीचं वातावरण निर्माण करून आणि अघोरी विधींचा आव आणत तो लोकांकडून मोठ्या रकमा उकळत असे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे, तो महिलांचे लैंगिक शोषण करतच नव्हता, तर काही प्रकरणांमध्ये महिला-पुरुषांच्या जोड्या जुळवून त्यातून ब्लॅकमेलिंगचे जाळेही उभं केल्याचा संशय आहे.
तक्रारींमध्ये एकच पॅटर्न दिसतो कुटुंबीयांना बाहेर पाठवून केबिनमध्ये महिलांवर अत्याचार. यामुळे हा प्रकार पद्धतशीर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आज खरातची पोलीस कोठडी संपत असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासासाठी कोठडी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.






