मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड स्टाफ म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दानिश मोहम्मद अन्सारी (27) आणि हल्ला झालेली तरुणी दोघेही वडाळा येथील अँटॉप हिल परिसरात राहतात. मागील चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय दानिशला आला होता. याच संशयातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर आरोपीने अचानक तरुणीवर चाकूने सपासप वार केले. या भयंकर हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी दानिशने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तात्काळ उपचारासाठी वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. कसून शोध घेत पोलिसांनी काही तासांच्या आतच पळून गेलेल्या आरोपी दानिश मोहम्मद अन्सारी याला बेड्या ठोकल्या. प्रेमसंबंधांमधील संशयावरून झालेल्या या खुनी हल्ल्याने नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






