पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदी माया शेखर रेड्डी (वय 21) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ती मूळची तेलंगणातील तिरूमलंगरी (हैदराबाद) येथील रहिवासी असून, कात्रज येथील नॅन्सी लेक होम सोसायटीमधील ‘जे’ विंगच्या फ्लॅट क्रमांक 1002 मध्ये राहत होती.कात्रज परिसरातील या सोसायटीत एका तरुणीने दहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. घटनेची बातमी मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल चोरमले आणि पोकळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर ही विद्यार्थिनी गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता, तिने इमारतीवरून उडी मारल्याचे निष्पन्न झाले. घटना घडली त्यावेळी मृत तरुणीचा भाऊ डॉ. आदी अदीम शेखर रेड्डी हे घरात उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी माया ही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. ती आपल्या भावासोबत या फ्लॅटमध्ये राहत होती. सध्या तिची वैद्यकीय परीक्षा सुरू होती. परीक्षेच्या अतितणावामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज तिच्या भावाने व्यक्त केला आहे.

या घटनेत कुटुंबाचा कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.






