पुणे: पुणे शहरात (Pune Weather) आज हवामानात संमिश्र बदल पाहायला मिळत असून, थंडी आता पूर्णपणे ओसरली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे आणि परिसरात प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. पहाटेच्या वेळी शहरात किंचित गारवा जाणवला असला, तरी दिवस चढेल तशी उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे.

आज पुण्याचे किमान तापमान 18°C ते 20°C दरम्यान नोंदवले गेले असून, दुपारी कमाल तापमान 33°C ते 34°C अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या मध्यावरच तापमानाचा पारा चढल्याने पुणेकरांना आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चकता अधिक जाणवेल, ज्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक उकाड्याने त्रस्त होण्याची शक्यता आहे.
हवेच्या गुणवत्तेबद्दल (AQI) बोलायचे झाले तर, पुण्याचा निर्देशांक आज 160 ते 170 (मध्यम श्रेणी) दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रतेचे प्रमाण साधारण 25% ते 34% असल्याने हवेत कोरडेपणा जाणवेल. काही भागात संध्याकाळच्या वेळी हलके ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते, मात्र पावसाची शक्यता आज तरी वर्तवण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊन उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.







