सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करत पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पत्नी, मुलगा आणि इतर साथीदारांसह पाच जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करत पत्नी, तिचा प्रियकर आणि मुलासह चौघांना अटक केली आहे.

आप्पासाहेब चव्हाण (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या तपासानुसार, २२ ऑगस्ट रोजी आप्पासाहेब यांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर पत्नी सुनीता चव्हाण आणि तिच्या प्रियकराने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आप्पासाहेब यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवण्यात आले. त्यानुसार अंत्यसंस्कारही करण्यात आले.

मृत्यूचे खरे कारण समोर येऊ नये यासाठी आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मुलगा आणि इतर साथीदारांचीही मदत घेण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण देणारी माहिती पोलिसांना फिर्यादी राजू तानाजी जाधव यांच्याकडून मिळाली. त्यांनी पोलिसांना काही गोपनीय माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांनी खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. या हत्येमागे अनैतिक संबंध असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.






