सातारा: सातारा येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Sharad Pawar) सर्व राजकीय पक्षांनी जोरदार (Shashikant Shinde) तयारी सुरु केली आहे. निवडणुका लवकरच (Stara News) होणार असल्यामुळे राजकीय नेत्यांचे विविध भागातील दौरे वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सातारा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या, ज्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी स्वतः उमेदवारांशी संवाद साधत अनेक निवडी अंतिम केल्याचे समजते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला काही ठिकाणी गळती जाणवत असली तरी ती भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे जितके महत्त्वाचे, तितकेच निवडणुकीत योग्य भूमिका घेणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीला वगळून समविचारी पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे चांगली लढत देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शशिकांत शिंदे म्हणाले की साताऱ्यातील सुसंस्कृत वर्ग, तरुण वर्ग आणि महिलांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर मागास प्रवर्गातील प्रतिनिधी भारतीय जनता पक्षापासून दूर जात असून समविचारी पक्षांसोबत येत आहेत. राज्य शासनाने ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतलेल्या विविध निर्णयांमुळे या प्रवर्गात संभ्रम आणि नाराजी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. सातारा शहरात महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे करून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले अस्तित्व मजबूत करेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाशिवाय इतर कोणत्याही समविचारी पक्षांशी युती करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले. स्थानिक पातळीवरील समीकरणांचा विचार करून आणि लोकांच्या भावना जाणून घेत योग्य उमेदवारांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदांसाठी अनेक इच्छुक आणि दिग्गज नेते संपर्कात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीची सत्ता साताऱ्यात आली तर गेल्या काही काळात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई होईल, असे ते म्हणाले. सर्व तपशील सध्या सांगता येणार नसला तरी काही काळात सर्व परिणाम लोकांसमोर स्पष्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







