Politics : कोल्हापुरात महापालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. पण या सगळ्या गदारोळात एक प्रचार सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पारंपरिक भाषणं, फलक आणि घोषणा यांना बाजूला ठेवत लोककलेच्या जोरावर थेट मैदानात उतरले आहेत प्रसिद्ध शाहीर दिलीप सावंत आणि त्यांची लेक. (politics)

हातात डफ-तुंतुणा, डोक्यावर फेटा आणि ओठांवर शाहिरी कवणं… अशा खास शाहिरी अंदाजात ही बाप-लेकीची जोडी कोल्हापुरातील मतदारसंघांमध्ये प्रचार करताना दिसतेय. दिलीप सावंत स्वतः शाहिरी करत लोकांना थांबवतात आणि त्यांची लेक दीप्ती जाधव थेट जनतेशी संवाद साधते.
शाहीर दीप्ती जाधव या कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांकातून निवडणूक लढवत असून त्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार आहेत. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. शाहिरी कवणांतून शहराचे प्रश्न मांडणे, विकासाची दिशा सांगणे आणि लोकांशी थेट संवाद साधणे, असा हा प्रचार सध्या नागरिकांना भावतो आहे.
रस्त्यावर, चौकात, वस्त्यांमध्ये अचानक सुरू होणारी शाहिरी ऐकायला लोक गोळा होत आहेत. राजकारणात लोककलेचा असा वापर क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे हा आगळावेगळा प्रचार केवळ कोल्हापुरातच नाही, तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.







