पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून (Pune Crime) ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून अवघ्या 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

अमनसिंग गच्चड असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणात प्रथमेश आढळ वय 19 आणि नागेश धबाले वय 19 या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी इन्स्टाग्रामवर एका मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून अमनसिंगशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून त्याला कात्रज परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनसिंगला कात्रज परिसरात बोलावल्यानंतर आरोपी त्याला खेड शिवापूर भागात घेऊन गेले. तेथे जुन्या वादातून दगड आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमनसिंग गच्चड हा 29 डिसेंबर 2025 रोजी दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परतला नाही. बराच वेळ होऊनही त्याचा काहीच संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी 31 डिसेंबर 2025 रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.
अमनसिंगच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनच्या आधारे तपास करत असताना अपहरण आणि हत्येचा गंभीर प्रकार उघडकीस आला. तपासात जुन्या वादातून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचा पुढील तपास Pune पोलीस करत असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







