Pune News : महाराष्ट्रात 2025 या वर्षात वाहन खरेदीचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षात राज्यभरात जवळपास 32 लाख 78 हजार नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल 13.55 टक्के आहे. विशेष म्हणजे यंदा पुणे शहराने वाहन खरेदीत मुंबईलाही मागे टाकलं आहे. पुण्यात एकट्या शहरात 3 लाख 31 हजारांहून अधिक नवीन वाहने नोंदली गेली आहेत. (Pune News)

केंद्र सरकारने शेवटच्या टप्प्यात वाहनांवरील जीएसटी कमी केल्यामुळे वाहन खरेदीला मोठी चालना मिळाली. जीएसटी कमी झाल्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आणि अनेकांनी नवीन वाहनं घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून 2025 मध्ये वाहन विक्रीत लक्षणीय वाढ पाहायला मिळाली.
या वर्षात नोंद झालेल्या वाहनांमध्ये दुचाकींचा वाटा सर्वाधिक आहे. तब्बल 22 लाख 92 हजार दुचाकी नोंदल्या गेल्या आहेत. त्याखालोखाल 5 लाख 5 हजार कार्स नोंदल्या गेल्या.
तसंच शेतीसाठी वापरले जाणारे 1 लाख 46 हजार ट्रॅक्टर, 1 लाख 35 हजार अवजड वाहने, 88 हजारांहून अधिक रिक्षा, 57 हजार इतर वाहने आणि 13 हजारांहून अधिक बसेस नव्याने रस्त्यावर आल्या आहेत.
याआधी 2024 मध्ये राज्यात 28 लाख 87 हजार वाहनांची नोंदणी झाली होती.
आकडेवारी पाहता, वाहन खरेदी करताना नागरिकांचा कल दुचाकींकडेच अधिक असल्याचं स्पष्ट होतं. पुणे शहरातच गेल्या एका वर्षात 2 लाख 11 हजारांहून अधिक दुचाकींची नोंदणी झाली आहे.
लाखांच्या पुढे गेलेली आरटीओ नोंदणी
2025 मध्ये राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
-
पुणे आरटीओ – 3,31,488 वाहने
-
मुंबई आरटीओ – सुमारे 3,20,000 वाहने
-
पिंपरी-चिंचवड आरटीओ – 2,17,728 वाहने
-
नाशिक आरटीओ -1,42,633 वाहने
-
ठाणे आरटीओ -1,17,705 वाहने
-
वसई आरटीओ -1,04,728 वाहने
-
कल्याण आरटीओ -1,02,153 वाहने
एकूणच पाहिलं तर 2025 हे वर्ष महाराष्ट्रासाठी वाहन खरेदीच्या बाबतीत भरभराटीचं ठरलं असून, त्यात पुणे शहर आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.







