बार्शी, ता. 21: शहरातील औद्योगिक वसाहतीमधील एका प्लायवूड कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्यानंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट उसळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

ही घटना बार्शी येथील औद्योगिक वसाहतीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, कारखान्यातील लाकूड व ज्वलनशील साहित्यामुळे आगीने झपाट्याने फैलाव घेतला. काही वेळातच संपूर्ण परिसर काळ्या धुराने व्यापला गेला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. प्रशासनाने तत्काळ परिसर रिकामा करून सुरक्षेची उपाययोजना केली आहे.
सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.







