Election : राज्यभरात महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अक्षरशः रंगात आला आहे. प्रत्येक पक्ष जोर लावत असून प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी उमेदवार आणि पक्ष वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. कुठे परराज्यातील नेते प्रचाराला येतायत, कुठे कलाकारांची हजेरी लागतेय, तर कुठे उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्यासाठी हिंदी भजनांचा आधार घेतला जातोय. (Election)

अशातच आता अहिल्यानगरात भाजपनं प्रचारासाठी भन्नाट कल्पना वापरली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात थेट आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि WWE सुपरस्टार द ग्रेट खली यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, “खली आला तर मतदार भाजपकडे वळतील का?” अशी चर्चा आता गल्लोगल्ली सुरू झाली आहे. याचं उत्तर 16 तारखेला मतपेटीतून मिळेल, पण सध्या तरी हा विषय चांगलाच चर्चेत आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने शहराचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सुरुवातीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आक्रमक प्रचार करत आघाडी घेतली आहे. सभा, बैठकांपासून ते रॅलीपर्यंत युतीकडून प्रचाराची धार वाढवण्यात आली आहे.
या प्रचाराला आणखी जोर देण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ द ग्रेट खली 13 जानेवारी रोजी अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढली जाणार असून, हा कार्यक्रम सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
ही रॅली भाजप नेते सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप-राष्ट्रवादी युतीने शिस्तबद्ध नियोजन, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विकासाचा मुद्दा पुढे ठेवत प्रभावी प्रचार केला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीतून केला जाणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरापासून दिल्ली गेटपर्यंत ही भव्य प्रचार रॅली निघणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारी ही रॅली प्रचारातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या रॅलीत भाजप-राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.







