Politics : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. येत्या 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महापालिका निवडणुकांबाबत थेट आपली भूमिका जाहीर केली आहे.

बुलढाण्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला थेट आवाहन केलं. ते म्हणाले, “जे लोक मराठा समाजाच्या विरोधात गेले, जे आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले, नेमके तेच आज निवडणुकीत उभे आहेत. अशा लोकांना मतदान करू नका.”
पुढे बोलताना त्यांनी सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “आता मराठ्यांनी कट्टर आणि कडवट झालं पाहिजे. या सरकारने मुस्लिम, दलित सगळ्यांना काडीला लावलं. अशा सरकारचा कार्यक्रम करा. इतकी खुन्नस ठेवा की यांना मतदानच करायचं नाही,” असं जरांगे पाटील म्हणाले. (Politics)
ते पुढे म्हणाले, “लोकसभेला आपण कसं वातावरण तयार केलं होतं, ते सगळ्यांनी पाहिलं. निवडणुकीत पैसे वाटले जात नाहीत असा आरोप होतो, पण इथे पैसे वाटलेच आहेत. यांच्याकडे इतका पैसा कुठून आला? आधी काय होतं आणि आता शर्टमधून दिसतील इतकी नोटांची बंडलं सोबत ठेवतात. नोटा वाटतात, घोळ करतात.”
महापालिकेतील राजकीय युतींवरही त्यांनी सवाल उपस्थित केला.“इथे कोण कुणासोबत आहे हेच कळत नाही. कधी राष्ट्रवादीसोबत जमतं, कधी भाजप-शिवसेनेसोबत, तर कधी काँग्रेससोबतही युती. म्हणजे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळेच एकत्र आले आहेत. मग यांचे शत्रू कोण? आम्ही गोरगरीब जनता ना?” असा सवाल त्यांनी केला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “आपला नेता निवडून यायला पाहिजे, मग युती कुणासोबतही करा हा यांचा अजेंडा आहे. लोकांना वाटतं पर्याय नाहीत, पण लोकांना एकदा पर्याय मिळू द्या, मग बघा जनता यांना कसं उलटंपालटं करते.”
शेवटी त्यांनी ठाम शब्दांत भूमिका मांडली. “जिल्हा परिषद, नगरपालिका अशा स्थानिक पातळीच्या निवडणुकांमध्ये मी पडत नाही. पण आपल्याला मोठा टप्पू मासा लागतो. त्याला जर माज असेल, तर तो माज उतरवलाच म्हणून समजा,” असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला.







