सोलापूर: महाराष्ट्राच्या भूमीत दडलेला (Boramani Stone Labyrinth) सुमारे 2000 वर्षांचा इतिहास (Solapur News) पुन्हा एकदा समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावातील संरक्षित गवताळ प्रदेशात भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह रचना सापडली आहे. या ऐतिहासिक शोधामुळे पुरातत्व क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Archaeological Discovery)

पुणे येथील डेक्कन कॉलेजचे पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी या शोधाला दुजोरा दिला आहे. ही दगडी चक्रव्यूह रचना सुमारे 50 फूट बाय 50 फूट व्यासाची असून त्यात 15 सर्किट आहेत. भारतात यापूर्वी सापडलेल्या चक्रव्यूह रचनांमध्ये जास्तीत जास्त 11 सर्किट आढळले होते. त्यामुळे बोरामणीतील ही रचना आतापर्यंतची सर्वात मोठी मानली जात आहे. (Breaking News)
ही रचना लहान लहान दगडी गोट्यांपासून तयार करण्यात आली आहे. चक्रव्यूहाच्या कडांमध्ये मातीचा स्वतंत्र थर दिसून येतो. हा थर आजूबाजूच्या जमिनीपेक्षा सुमारे 1 ते 1.5 इंच उंच असल्याने, ही रचना दीर्घकाळ मानवी हस्तक्षेपाशिवाय सुरक्षित राहिल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
सचिन पाटील यांच्या मते, या चक्रव्यूहाची रचना पहिल्या ते तिसऱ्या शतकातील रोमन नाण्यांवर आढळणाऱ्या चक्रव्यूहाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे सातवाहन काळात पश्चिम किनाऱ्यावरून अंतर्गत भागात जाणाऱ्या रोमन व्यापाऱ्यांसाठी ही रचना मार्गदर्शक चिन्ह म्हणून वापरली जात असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शोधामुळे धाराशिवमधील तेर आणि रोमन साम्राज्य यांच्यातील प्राचीन व्यापार संबंधांवर नवा प्रकाश पडला आहे.
बोरामणी गवताळ सफारी अभयारण्यात पाहणी करत असताना नेचर कन्झर्वेशन सर्कल, सोलापूरच्या सदस्यांना ही रचना प्रथम आढळली. त्यांनी त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधून याचे महत्त्व लक्षात आणून दिले.
स्थानिक भाषेत या चक्रव्यूह रचनांना ‘कोडे’ असे म्हटले जाते. विविध संस्कृतींमध्ये त्यांना चक्रव्यूह, मनचक्र किंवा यमद्वार अशी नावे आहेत. या रचना केवळ मार्गदर्शनासाठीच नव्हे, तर ध्यान, आध्यात्मिक साधना आणि सांस्कृतिक परंपरांशीही जोडल्या गेल्याचे अभ्यासक सांगतात.
या शोधाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून, लंडनमधील चक्रव्यूह संशोधकांनी याला महत्त्वपूर्ण ठरवले आहे. महाराष्ट्राच्या भूमीत दडलेली ही ऐतिहासिक रचना प्राचीन जागतिक व्यापाराची कथा पुन्हा एकदा समोर आणत आहे.







