विशाल शिंदे

पुणे: राज्य (Bhor News) उत्पादन शुल्क विभागाने भोर तालुक्यातील (Pune Crime) सारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर धाडसी कारवाई करत औषधांच्या आडून गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध नामांकित ब्रँडच्या दारूच्या बाटल्या, ट्रक, चारचाकी वाहन व मोबाईलसह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संपत लक्ष्मण गावडे (वय ५९, रा. आंबेगाव बुद्रुक) आणि समीर गणपत राऊत (रा. पुणे) यांचा समावेश आहे. (Marathi Breaking News)
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजता सारोळा गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर संशयास्पद ट्रक अडवून तपासणी केली. ट्रकचालकाने वाहनात औषधे असल्याचे सांगितले होते. मात्र अधिक तपासणी केली असता औषधांच्या खाल्लोखाल गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूच्या १८६ बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत ट्रक व मोबाईलसह १७ लाख ९९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर नेत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आंबेगाव बुद्रुक परिसरात छापा टाकला. यावेळी समीर राऊत याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातूनही मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. तसेच आरोपी संपत गावडे याच्या निवासस्थानी झडती घेतली असता आणखी प्रतिबंधित दारू जप्त करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे व उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, प्रणव मेहता व शीतल शिंदे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने ही कारवाई यशस्वी केली.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दारू तस्करीच्या या रॅकेटमागील इतर सहभागी, पुरवठा साखळी व आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.






