Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने आज सकाळी शहरात एकच खळबळ उडाली. ही धमकी मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ अलर्ट मोडवर आली.

आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल आला. ही माहिती मिळताच लगेच पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची सखोल तपासणी सुरू करण्यात आली.
इमारतीतील प्रत्येक मजला, प्रवेशद्वार, पार्किंग आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर बारकाईने तपासला जात आहे. कोणताही धोका होऊ नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेमुळे काही वेळ कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, ही धमकी नेमकी कोणी दिली आणि त्यामागचा उद्देश काय, याचा तपास पोलीस आणि सायबर पथक करत आहे. हा मेल कुठून आणि कोणत्या ई-मेल आयडीवरून पाठवला गेला, याची तांत्रिक माहिती गोळा केली जात आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, सकाळी सव्वा नऊ वाजता बॉम्ब धमकीचा मेल आला होता. त्यानंतर पोलीस तात्काळ सतर्क झाले असून बॉम्ब शोध पथकाकडून तपास सुरू आहे. मेल पाठवणाऱ्याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात येणार असल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.






