अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-संगमनेर (Ahilyanagar Accident) मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News)

प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि 2 लहान बालकांचा समावेश आहे. सर्वजण श्रीरामपूर येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार वेग, चुकीची ओव्हरटेकिंग किंवा समोरून आलेल्या वाहनाचा ताबा सुटणे ही संभाव्य कारणे असू शकतात. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे श्रीरामपूरमध्ये शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






