Maharashtra Politics: नागपूर: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची विरोधी पक्षावर जोरदार टिका सुरु आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)

मतदान न केल्यास निधी रोखण्याचे संकेत आणि तिजोरीची चावी आपल्या हातात असल्याचे दावे करत सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या विधानांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. “ही भाषा म्हणजे सत्तेचा माज” असे ते म्हणाले.
मत दिलं तर योजनांना निधी देईल, मतदान केले नाही तर निधी कात्री लावेन, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असतील पण तिजोरीचा मालक आपला आहे, असे प्रतिउत्तर देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्यावर रुपाली चाकणकर यांनी देखील टीका शस्र हाती घेत अर्थमंत्री आपलेच आणि चाव्याही आपल्याच हातात, असे विधान मांडले.
महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची खासगी संपत्ती आहे का?यांच्या बापजाद्यांनी कमावलेली तिजोरी आहे का?, गुंडगिरीची भाषा वापरत असताना निवडणूक आयोगाला दिसत नाही का असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.







