Accident News: भंडारा: भंडारा जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली असून लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या नवरदेवाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी पुनर्वसनजवळील कवडसी फाटा येथे गुरुवारी रात्री सुमारे 8 वाजता घडली. दुर्गेश किशोर लांजेवार (वय 33) रा. पेट्रोलपंप असे मृत तरुणाचे नाव आहे. (Death before Wedding)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दुर्गेश कामानिमित्त कवडसी फाटा परिसरात गेला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भंडाराकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. ट्रकचा क्रमांक MH14 LX 4219 असा आहे. अपघात इतका भीषण होता की दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुर्गेशचा 11 जानेवारी रोजी गावातीलच एका युवतीशी विवाह ठरला होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईक, मित्रपरिवार आनंदात होता. वर आणि वधू दोघेही एकाच गावातील असल्याने परिसरातही लग्नाचा उत्साह दिसून येत होता. मात्र एका क्षणात सगळ्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले. संसार सुरू होण्याआधीच दुर्गेशचा अपघाती मृत्यू झाल्याने लांजेवार कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. शुक्रवारी दुर्गेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात शुभकार्य असताना अशी दुर्दैवी घटना घडल्याने नातेवाईक आणि गावकरी भावूक झाले होते.
या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमाजी पाटील करत आहेत. अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.




