State Government Decision: महाराष्ट्र : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) विस्तार आता थेट गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण रुग्णांना छोट्या उपचारांसाठी किंवा किरकोळ शस्त्रक्रियांसाठी शहरातील रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. गावातच उपचार उपलब्ध झाल्याने वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार आहे.

आतापर्यंत ही योजना प्रामुख्याने खासगी रुग्णालये आणि मोठ्या सरकारी रुग्णालयांपुरती मर्यादित होती. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना साध्या उपचारांसाठीही लांबचा प्रवास करावा लागत होता. मात्र, आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच जखमेवर टाके घालणे, किरकोळ शस्त्रक्रिया, तपासण्या आणि आवश्यक उपचार मोफत मिळणार आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार कवच मिळणार आहे. गंभीर आजारांबरोबरच आता छोट्या उपचारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेशी जोडण्यासाठी सध्या नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जे केंद्र आवश्यक निकष पूर्ण करतील, त्यांना तात्काळ मान्यता देण्यात येणार असून त्या ठिकाणी योजनेअंतर्गत उपचार सुरू केले जाणार आहेत. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण नागरिकांना वेळेत आणि जवळच्या ठिकाणी उपचार मिळाल्याने आरोग्याच्या समस्या लवकर हाताळल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






