Suicide News: जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रमोद पुरुषोत्तम पाटील यांनी नशिराबादमधील हॉटेल आस्वाद येथे आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली असून त्यात काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत भागीदारीत हॉटेल आस्वाद सुरू केले होते. काही कारणांमुळे मागील काही दिवसांपासून हे हॉटेल बंद असल्याचे सांगितले जाते. संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीत सुरू होते ती जमीन इतरांच्या मालकीची असल्याने ती जागा खाली करण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणात मोबदल्याबाबत वाद निर्माण झाल्यामुळे प्रमोद पाटील यांना मानसिक तणाव जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रमोद पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन व्यक्तींकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचेही समोर आले आहे. सहकारी मित्रांकडून अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे ते तणावाखाली होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या तणावातूनच त्यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. काही काळ नशिराबाद पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी योग्य तपास करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.







