Nashik Crime : नाशिक : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण आणि धार्मिक कट्टरतेचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी तपासात अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींनी संगनमताने इतर धर्मीय तरुणींना टार्गेट करण्यासाठी व्हॉट्सॲपवर गुप्त गट तयार केले होते. या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या ठराविक तरुणांचा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय होता. या ग्रुपवर केवळ कामाबद्दलच नाही, तर आता पुढचे लक्ष्य कोणाला करायचे, यावर सविस्तर चर्चा व्हायची असा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या तरुणींना जाळ्यात ओढले जायचे, त्यांच्यासाठी पुन्हा एक वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्यांचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश केले जात असे. संशयित आरोपी तरुण स्वतःला सिंगल असल्याचे सांगून तरुणींशी जवळीक साधायचे. त्यांना बाहेर जेवायला नेणे, त्यांचे कौतुक करणे आणि कंपनीत हव्या त्या ठिकाणी बदली किंवा रजा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उपकृत करणे, अशी यांची कामाची पद्धत होती.
ज्या तरुणींनी या आमिषांना बळी पडण्यास नकार दिला, त्यांना कंपनीत मानसिक त्रास दिला जात असे. या छळाला कंटाळून अनेक तरुणींनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. या संपूर्ण कटात केवळ तरुणच नाही तर काही तरुणींचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल केले आहेत. आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी आणि दानिश शेख हे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, निदा खान नावाच्या संशयित तरुणीचा शोध सुरू आहे.
या गंभीर प्रकारानंतर नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. कंपनीत महिलांचे शोषण आणि धर्मांतराचे प्रयत्न करणाऱ्यांवर तसेच कंपनी प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता, ज्यामुळे पोलिसांना दंगा नियंत्रण पथक पाचारण करावे लागले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्वतः कंपनीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







